बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पेठ येथील संत ज्ञानेश्वर शासकीय मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका शिक्षकाने हॉस्टेलमधील विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. नराधम आरोपी मागील दोन महिन्यांपासून सातत्याने मुलाचं लैंगिक शोषण करत होता. पीडित विद्यार्थ्यानं या घटनेची माहिती आईला दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
विनायक देशमुख असं नराधम आरोपीचं नाव आहे. तो पेठ येथील संत ज्ञानेश्वर शासकीय मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात अधीक्षक आहे. त्याने शासकीय वसतिगृहात एका १३ वर्षीय विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. हा घृणास्पद प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी आरोपीला गजाआड केल असून त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम ६८, ११८ (१) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
आरोपी विनायक देशमुख हा पेठ येथील रहिवासी आहे. त्याने मागील दोन महिन्यांपासून सातत्याने मुलावर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित मुलाने त्याच्यासोबत सुरू असलेल्या कृत्याची माहिती आपल्या आईला दिली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास अमडापूर पोलीस करत आहेत.
अशीच घटना पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरातही
दुसऱ्या एका घटनेत पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरात देखील अशीच एक घटना घडली होती. येथील एका शैक्षणिक संस्थेत पाहुणा बनून आलेल्या नराधम आरोपीनं हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केला होता. ही घटना ताजी असताना आता बुलढाण्यात देखील अशाच प्रकारची घटना घडली आहे. यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येताना दिसत आहे.