नाशिक : नाशिक पुन्हा एकदा हादरलं आहे. एका तरूणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. पंचवटी कारंजा परिसरात ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. डोक्यात दगड घालून युवकाची हत्या करण्यात आली आहे. पोलीस चौकीपासून काही अंतरावरच घटना घडली असल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की, पंचवटी करंज्या परिसरात रात्री बारा वाजता एका युवकाचा खून झाला आहे. पहाटे तीन वाजेच्या सुमारास या तरूणाला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. ऐन गणेश उत्सवाच्या काळात खून झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अतुल सूर्यवंशी असं मृत तरूणाचं नाव असल्याचं समोर येत आहे.
पूर्व वैमन्यासातुन हत्या..
प्राथमिक तपासात पोलिसांनी अतुल सूर्यवंशी या तरुणाची पूर्व वैमन्यासातुन हत्या झाल्याची माहिती दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत असून एका संशयिताला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. म्हसरूळ परिसरातील अतुल सूर्यवंशी नामक युवकाची रात्रीच्या सुमारास हत्या झाली आहे. डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून ठार केल्याचं समोर आल आहे.