मुक्ताईनगर (जळगाव) : जळगाव जिल्ह्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात होणारी निवडणूक ही अटीतटीची होताना दिसत आहे. प्रचाराला सुरवातच झाली असतं एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या प्रचार रॅली दरम्यान गोळीबार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा दिवस गेल्यानंतर बहुतांश उमेदवारांकडून आज प्रचारास सुरवात करण्यात आली आहे. त्यानुसार मुक्ताईनगर मतदारसंघात प्रचार सुरु झाला आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार असलेले विनोद सोनवणे हे आज बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारुती येथे प्रचाराचा शुभारंभ करून ते तालुक्यातील राजुरा येथे प्रचारासाठी निघाले असता त्यांच्या ताफ्यावर अज्ञात इसमांकडून गोळीबार करण्यात आल्याचा आरोप विनोद सोनवणे यांनी केला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे मैदानात आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागून आहे.