नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अनैतिक संबधाला अडथळा ठरत असलेल्या भावाचा सख्या मावसभावाने खुन केल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी फाडा भागातील कचरा डेपो परिसरात उघडकीस आला आहे. डोक्यात काहीतरी वस्तूने वार करत खुन केल्याचे प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चार संशयित फरार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरातील कचरा डेपोच्या मागे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेत पहाणी केली. मयताच्या खिशातून अधारकार्ड मिळून आले. त्या अधारे मयताची ओळख पटवण्यात आली.
योगेश सुभाष बत्तासे (वय ३१ रा. पिंपरखेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयताच्या कुटुंबियांशी संपर्क साधून कुटुंबियांना ओळख पटवली. त्याच्या चौकशीत मयताच्या पत्नीचे त्याच्या मावस भावासोबत अनैतिक संबध असल्याची माहिती समोर आली आहे. मयताला अनैतिक संबधाची भनक लागल्याने पती पत्नी मध्ये वाद सुरु असल्याचे समजले. वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित मावसभावाला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु आहे.