नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बाळाची अदलाबदल केल्याचा धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर गर्भवती महिलेला मुलगा झाला होता. पण रुग्णालयातून डिस्चार्ज देतेवेळी हातात मुलगी देण्यात आली. मंगळवारी हा प्रकार घडला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून नातेवाईकांनी अपत्याचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. रुग्णालय प्रशासनाला महिलेच्या नातेवाईकांनी आणि प्रहार संघटनेनं चांगलंच धारेवर धरलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात महिलेनं मुलाला जन्म दिला होता. रुग्णालयाच्या रजिस्टरमध्येही मुलगा झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. पण महिलेला डिस्चार्ज देत असताना मात्र तिच्या हातात मुलगी सोपवण्यात आली. नातेवाईकांना या प्रकाराने एकच धक्का बसला. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.
मुलगा झाल्यानंतर मुलगी हातात सोपवल्यानं नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. रुग्णालयाने हातात सोपवलेली मुलगी स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला आहे. रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी आणि नातेवाईकांमध्ये यावर चर्चाही झाली पण त्यावर काहीच तोडगा निघाला नसल्याचे समोर आले आहे.