जळगाव : जळगावमध्ये बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक दंग होते. या दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली. परिवारातील सदस्य देखील गणेश विसर्जन करण्यासाठी गेले होते. यावेळी घरात एकट्या असलेल्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे. गणेश विसर्जन करून परतल्यानंतर हा प्रकार समोर आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील समता नगर परिसरात ही घटना घडली आहे. दीपक नारायण लोहार (वय २८) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून दीपक लोहार हा मुळ जामनेर तालुक्यातील आहे. काही वर्षांपुर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्यामुले दीपक हा जळगाव शहरातील समता नगरात वास्तव्यास असलेल्या अनिता ढोले या त्याच्या बहिणीकडे रहायला आला होता. तर आई तोंडापुरलाच राहत होती. दीपक हा पाच बहिणीचा एकुलता एक भाऊ होता. दीपक हा एका हॉस्पिटलमध्ये ड्रायव्हर म्हणून कामाला होता. सकाळी घरी आल्यानंतर तो दिवसभर झोपला होता.
दरम्यान, बहिण अनिता ढोले या गणपती विसर्जनाची तयारी करत होत्या. त्यांनी विसर्जनासाठी भावाला देखील उठवले. मात्र, भाऊ आला नाही. त्यानंतर अनिता ढोले या आपल्या परिवारासह गणपती विसर्जनासाठी गेल्या असता घरात कोणी नसताना दीपकने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. अनिता या घरी परतल्यानंतर त्यांना भावाने गळफास घेतल्याचे दिसताच हंबरडा फोडला. दिपकच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.