नाशिक : अजित पवार यांना एक धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नरहरी झिरवाळ यांनी ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. अजित पवारांना हा धक्का मानला जात आहे. नरहरी झिरवाळ यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना संदीप गुळवे यांचं काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, संदीप गुळवे यांना आपला जाहीर पाठींबा असल्याचीहि घोषणा नरहरी झिरवाळ यांनी केली आहे. तसेच, कौटुंबिक संबंधांमुळे आपण संदीप गुळवेंना जाहीर पाठींबा देत आहोत, असे नरहरी झिरवाळ यांनी जाहीर केलं आहे.
नरहरी झिरवाळ हे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितर पवार गटाचे आमदार आहेत. तर संदीप गुळवे ठाकरे गटाचे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार आहेत. झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप गुळवे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी झिरवाळ यांनी गुळवेंना जाहीर पाठींबा देत असल्याचे जाहीर केले आहे. झिरवाळ यांच्याकडून संदीप गुळवे यांना आगळंवेगळं रिटर्न गिफ्ट मिळाल्यामुळे गुळवे आणि त्यांचे कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढला आहे.
पक्षीय गणित बाजूला ठेवून पाठिंबा : नरहरी झिरवाळ
संदीप गुळवे हे काँग्रेसमधून नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेतर्फे किशोर दराडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात विवेक कोल्हे यांनी देखील अपक्ष उमेदवारी जाहीर केली असून ते निवडणूक लढवत आहेत. संदीप गुळवे यांना शिक्षक मतदारसंघात पक्षीय गणित बाजूला ठेवून पाठिंबा देत आहे, असं नरहरी झिरवाळ म्हणाले.