नंदूरबार : विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यातील अनेक ठिकाणी अनेक पक्षांमध्ये वाद, राडा आणि भांडणं झाल्याच्या घटना घडल्या होत्या. नंदूरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवामध्ये देखील वाद झाल्याची घटना घडली होती. सोरापाडा येथे भाजप आणि शिंदे गटामध्ये जोरदार राडा झाल्याचे बघायला मिळाले होते. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार आमश्या पाडवी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आमश्या पाडवी यांच्यावर एका महिलेने विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीमधील दोन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमधील संघर्ष पाहायला मिळाला. अक्कलकुवाच्या सोरापाडा येथे दोन गटात वाद झाला होता. याप्रकरणात आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोप करणारी महिला आणि तिचा भाऊ भाजपाचे कार्यकर्ते असून या महिलेचा भाऊ भाजपा पंचायत समिती सदस्य असल्याची माहिती पुढे आली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत आमश्या पाडवी यांच्याविरोधात काम केल्याचा रागातून कुटुंबातील सदस्य आणि महिलेला मारहाण झाल्याचा आरोप आमश्या पाडवी यांच्यावर केला गेला आहे. आमदार पाडवी यांचा मुलगा जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी, मुलगी सोरापाडा सरपंच अंजू पाडवी यांच्यासह कार्यकर्ते यांच्यावर अक्कलकुवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.
आमदार आमश्या पाडवी यांच्या मुलीने सुद्धा भाजपा पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, भाजप नेते नागेश पाडवी, भाजपा तालुका अध्यक्ष नितेश वळवी यांच्यासह पीडित महिला आणि तिच्या भावाविरोधात अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.