अहमदनगर : शरद पवार यांचे महायुतीला धक्क्यावर धक्के देण्याचे सत्र सुरूच आहे. शरद पवार गटाकडून अहमदनगरमधील अकोलेत मार्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते मधुकर पिचड पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत परतणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पिचड पिता पुत्र यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. किरण लहामटे यांच्याकडून पराभव झाला होता. दरम्यान, आगामी विधानसभेच्या जागा जिकंण्यासाठी शरद पवार हे मधुकर पिचड यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. या आठवड्यात शरद पवार अकोल्याचा दौरा करणार आहेत.
अकोले तालुका मधुकरराव पिचड यांचा बालेकिल्ला
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडत महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर डॉ. किरण लहामटेही अजित पवार यांच्यासोबत महायुतीमध्ये सहभागी झाले. आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये डॉ. लहामटे हे महायुतीचे उमेदवार राहण्याची दाट शक्यता असल्यामुळे पवार यांनी अकोल्यामध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच शरद पवार यांनी पिचड पिता पुत्राला आपल्या गटात घेण्याचा डाव टाकला आहे. अकोले तालुका जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
शरद पवार मधुकर पिचड एकाच स्टेजवर
अकोल्यातील दिवंगत नेते अशोक भांगरे यांच्या जयंतीनिमित्त १९ जुलै रोजी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला शरद पवार आणि मधुकर पिचड देखील उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.