छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर देत शरद पवार म्हणाले, तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिला आहे, अशी टीका पवारांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेत्यांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच अमित शहा यांनी
शरद पवार यांचा उल्लेख भ्रष्टाचाराचे सरदार असा केला होता. त्या टीकेनंतर शरद पवारांनीही तडीपार नेते असं म्हणत जोरदार उत्तर दिलं होतं. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत अमित शाहांवर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं असल्याचं म्हटलं होतं. बावनकुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले की, आम्ही तो दिवा महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिला आहे.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, केंद्रातील सरकार पडणार की नाही मला माहीत नाही, पण जोपर्यंत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू मोदींसोबत आहेत तोपर्यंत सरकारला अडचण नाही. आधी सत्ता मोदींच्या हातात होती आता त्यात वाटेकरी आले आहेत, असंही शरद पवार यावेळी म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही एकत्र निवडणूक लढवणार असल्याची आमची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वजण एकत्र आले तर ठीक, अन्यथा त्याची किंमत मोजावी लागेल, असा दम पवारांनी पक्षातील नेत्यांना भरला आहे.