येवला : वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा, असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. छगन भुजबळ यांनी येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजितपवार यांच्यावर टीका करत कार्यकर्त्यांसमोर आपल्या कार्याचा लेखाजोखाच मांडला आहे.
माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने छगन भुजबळ नाराज झाले असून नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडून ते थेट नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
काय म्हणाले छगन भुजबळ?
आठ दिवसांपूर्वी समीर भुजबळ यांना पटेल, तटकरे यांनी बोलवले. नितीन पाटील यांचा राजीनामा घेवून छगन भुजबळ साहेबांना राज्यसभेवर पाठवू, असं सांगितले. मकरंद पाटील यांना मंत्रिपद द्यायचे अन् त्याच्या भावाला खाली बोलवायचे. हा काय पोरखेळ आहे का? लोकांनी मला निवडून दिले आहे, त्यांना मी काय तोंड देवू. त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा होता का? छगन भुजबळ काय लल्लू पाटील आहे का? हा काही पोरखेळ आहे का? माझ्या मनात मंत्री पदाची शंका होती, अन् त्याप्रमाणे झाले आहे. माझी जर किंमत होत नसेल तर काय उपयोग? दादाचा वादा. वाह रे दादाचा वादा, कसला वादा, अन् कसला दादा, असं म्हणत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे.
मला बंगल्यावर ठार मारायचा प्रयत्न झाला
पुढे बोलताना म्हणाले, मंत्री येतात, मंत्री जातात. मला अनेक वेळा मंत्रीपदे मिळाली. 1991 मध्ये मी महसूलमंत्री पद घेतले. 1993 मध्ये गृहमंत्रीपद घेतले. ज्यावर आता भांडणे सुरू आहेत. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी शरद पवारांनी मला बसवले, त्यांची अपेक्षा पूर्ण केली. मला बंगल्यावर ठार मारायचा प्रयत्न झाला. त्यावेळी काँग्रेस एकत्र राहिली असती तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते, असंही भुजबळ यावेळी म्हणाले.
त्यावेळी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर : छगन भुजबळ
शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, त्यावेळी मी त्यांच्यासोबत राहिलो. मला मुख्यमंत्री पदाची ऑफर मिळाली होती. त्यावेळी कोणाचाच पत्ता नव्हता, मी आणि शरद पवार आम्ही दोघेच होतो. शरद पवारांनी मला उपमुख्यमंत्रीपद दिले, गृहमंत्री बनवले. ‘टाडा’ त्यावेळी जोरात होता, मी गृहमंत्री झालो. दाऊदचे कोणी नाव घेत नव्हते, छगन भुजबळ यांनी त्याचे नाव गृहमंत्रीपदी असताना घेतले होते, असं भुजबळ म्हणाले.
मुस्लिम माणसाचा पेहराव करून गोव्याला गेलो
पुढे म्हणाले, बेळगाव सत्याग्रहाला बाळासाहेब ठाकरे यांनी मला पाठवले होते. कर्नाटकात शिवसेनेचा राग होता. सगळीकडे चेकिंग सुरू होती, मी मुंबईत आलो. चेहऱ्याला दाढी लावली, हाती शबनम घेतली आणि गोव्याला गेलो. मुस्लिम माणसाचा पेहराव करून घेतला. गोव्यात काही कार्यकर्ते भेटले, तेथून मी कर्नाटकमध्ये गेलो. ज्या ज्या वेळी आदेश झाला त्यावेळी मी काम केले, असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपल्या कार्याचा आलेख समर्थकांसमोर मांडला आहे.