अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आत्तापर्यंत तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये दोन तरुण उमेदवारांचा समावेश आहे. रोहित पाटील यांच्यापाठोपाठ शरद पवार यांचाकडून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
अकोलेतील शेतकरी मेळाव्यामध्ये शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार म्हणाले, अमित भांगरे यांच्या पाठीशी उभे राहा, येथील अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांना खाली बसवा असं आवाहन त्यांनी केलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले की, अमित भांगरे आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी शक्ती उभी करा. तुमची मदत असेल तर अकोल्यामध्ये बदल झाल्याशिवाय आणि तरुणांच्या ताकदीवर अकोले आणि महाराष्ट्रातले राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही. पाच वर्षांपूर्वी एका डॉक्टरला मी संधी दिली. मला वाटलं साधा माणूस आहे, शब्दाला किंमत देईल.
त्यांनी काही झालं तरी पवार साहेबांची साथ सोडणार नाही असं भाषण केलं होतं. मात्र, मुंबईमध्ये गेल्यानंतर हा भलतीकडे जाऊन बसला. कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही, त्याला विधानसभेत खाली बसवायची वेळ आली आहे, असं शरद पवार म्हणाले.
विधानसभेसाठी तीन उमेदवारांची घोषणा
काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी सांगली जिल्ह्यातील तासगावमधून रोहित पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ करमाळ्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातून नारायण पाटील यांच्या नावाची घोषणा केली. आता शरद पवार यांनी अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे विधानसभेसाठी तीन उमेदवार ठरल्याचं दिसून येत आहे.