नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातुन मोठी बातमी समोर येत आहे. अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरलेले स्वामी शांतीगिरी महाराज यांनी आज शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांना अद्याप पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आलेला नाही. यासंदर्भात शांतीगिरी महाराजांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले शांतिगिरी महाराज?
आमच्या लोकसभेच्या मंडळींनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक निर्णय जनता जनार्दन आणि लोकसभा कमिटीच्या मार्फत होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाकडून आज मी उमेदवारी अर्ज भरला आहे. हा निर्णय आमच्या लोकसभा कमिटीने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
आमचे सगळे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी शांततेने ऐकून घेतले आहेत. मुद्द्यांच्या आधारे आपण निर्णय नंतर घेऊ असं त्यांनी आम्हाला सांगितले होते. उमेदवारीबाबत भगवंताची इच्छा आहे, असं आम्ही समजतो. प्रभू रामाच्या हातात धनुष्य आहे. त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर करतील, असं शांतिगिरी महाराज यावेळी म्हणाले.
आम्ही महायुतीचे उमेदवार या संदर्भात कोणतेही वक्तव्य केलेलं नाही. जय बाबाजी भक्त परिवाराने विडा उचलला आहे. या वेळेला लढायचं आणि जिंकायचं, असं आम्ही ठरवलं आहे. आमच्या भक्त परिवाराने परस्पर चर्चा केली असून त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. पक्षाच्या एबी फॉर्मबाबत आमचे वकील आणि भक्त परिवार निर्णय घेतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे की, योग्य तो निर्णय घेऊ. निवडणुकीबाबत आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, अशी माहिती शांतिगिरी महाराज यांनी यावेळी दिली आहे.
कोण आहेत स्वामी शांतिगीरी महाराज?
स्वामी शांतिगिरी महाराज यांचा नाशिकमध्ये मोठा वर्ग आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक फिरवण्याची ताकद त्यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे. २००९ मध्ये लोकसभा निवडणूक रिंगणात शांतीगिरी महाराज उतरले होते. त्यावेळी ते कोणत्या राजकीय पक्षातून निवडणूक लढवत नव्हते. असं असताना त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतेली होती.
यामुळे तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांचे टेन्शन वाढले होते. पण या निवडणुकीनंतर त्यांनी राजकारणात फारसा रस दाखवला नाही. त्यात काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शांतिगीरी महाराजांचा फोटो व्हायरल झाला होता. यावेळी लोकसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी शांतिगीरी महाराजांना दिल्याची चर्चा होती.