सटाणा : शहरातील बस स्थानकामागे भरवस्तीत असलेल्या एका कॅफेवर पोलिसांनी धाड टाकत सहा तरुणींसह काही तरूणांना ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच एकांताच्या शोधात असणाऱ्या तरुण-तरुणींचेही धाबे दणाणले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, शहरातील बस स्थानकामागे ६० फुटी रस्त्याजवळ नागरी वसाहतीत असलेल्या एका कॅफेमध्ये सकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात तरूण तरुणींचा वावर वाढल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी गुरूवारी (दि.१८) सापळा रचून सकाळी अकरा वाजेच्या सुमारास छापा टाकला.
यावेळी बाहेरगावातील सहा तरूणी व तरूण पोलिसांना तेथे आढळले. पोलिसांच्या या धडक कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या सर्व तरुण-तरुणींना पोलीस ठाण्यात नेत त्यांची चौकशी केली. यावेळी पोलीस ठाण्यात पालकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी पोलिसांच्या चौकशीत संशयित तरुण-तरुणींनी मित्रासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी, तर काहींनी चहा-कॉफी पिण्यासाठी तेथे गेल्याची कारणे दिली. पोलिसांनी सर्व तरूण-तरुणींच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत तरूण तरूणींना पालकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून पालकांनी आपल्या पाल्यांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील काही विद्यार्थी, विद्यार्थिनी महाविद्यालय, क्लासच्या नावाखाली शहरातील कॅफे, लॉजींग व धुम्रपानाच्या ठिकाणांवर आढळत असल्याची बाब समोर येत असल्याने पोलिसांनी अॅक्शन प्लॅन तयार करून या ठिकाणांवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा सज्जड इशाराही पोलीस निरिक्षक बाजीराव पोवार यांनी दिला आहे. येत्या दोन दिवसात लॉजिंग धारकांचे परवाने तपासून त्यांना समज दिली जाईल व कॅफे व्यावसायिकांना व्यवसायासाठी देण्यात आलेल्या परवानग्यांची माहिती घेऊन त्यांना कडक कारवाईची समज दिली जाणार असल्याचे पोवार यांनी स्पष्ट केले आहे.