नाशिक : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या प्रवेशाची यादी १३ जून रोजी प्रसिद्ध होणार होती. मात्र, आरटीईचे संकेतस्थळच खुले होत नसल्याच्या तक्रारींमुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. त्यावर तांत्रिक कारणांमुळे यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रियाच सुरू झाली नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. परिणामी आरटीई अंतर्गत प्रवेशाची यादी लांबणीवर पडली आहे. आता पालकांना आणखी चार-पाच दिवस वाट पहावी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या असून, आरटीईअंतर्गत आमच्या मुलांचे प्रवेश कधी होणार, असा सवाल पालकांनी केला आहे. दरम्यान, न्यायालयीन सुनावणीमुळेही आरटीई सोडत खोळंबल्याचे सांगितले जाते. शासनाची आरटीईची वेबसाइटच ठप्प झाल्याने यासंदर्भात पालकांना कोणतीही माहिती मिळत नाही. शिक्षण विभागाने आरटीई प्रक्रियेत केलेला बदल, त्याला न्यायालयाने दिलेली स्थगिती, त्यानंतरच जुन्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय, या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काही पालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
गोंधळाच्या परिस्थितीने अनेक पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश अन्य शाळेत घेतले. परिणामी यंदा विद्यार्थ्यांच्या अर्जाच्या संख्येत घट झाली आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात यंदा ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार ३९९ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. नाशिक जिल्ह्यातील ४२८ शाळांमध्ये ५२७१ जागा रिक्त असून, यासाठी १४ हजार ६४ अर्ज ऑनलाइन दाखल झाले आहेत. आरटीई प्रवेशाची सोडत दि. ७ जून रोजी निश्चित करण्यात आली होती; परंतु प्रकरण न्यायालयात पोहोचल्याने प्रवेशाची यादी १३ जूननंतर प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र, १३ जूनपासून संकेतस्थळच खुले होत नसल्याचे पाहून पालकांमध्ये पुन्हा खळबळ निर्माण झाली. या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी अजून पुढील सूचना आल्या नसल्याचे सांगितले. किमान वेबसाइट तरी खुली करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.