राहुरी : राहुरी तालुक्यातील सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याचा मृतदेह घोरपडवाडी शिवारात आढळून आला आहे. भाऊसाहेब कचरू ब्राम्हणे (वय -६७) असं सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत सून वर्षा विशाल ब्राम्हणे, व्याही चंद्रकांत दादा ओहोळ, राजेंद्र दगडू भोसले, पुतण्या सुनिल एकनाथ ब्राम्हणे यांच्याकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीना तात्काळ अटक केली आहे. वर्षा विशाल ब्राम्हणे (सून, रा. चिंचोली फाटा) व्याही चंद्रकात दादा ओहोळ (रा. फत्याबाद ता. श्रीरामपूर), पुतण्या सुनिल एकनाथ ब्राम्हणे (रा. चिंचोली फाटा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर राजेंद्र दगडू भोसले (रा. श्रीरामपूर), हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत मयत भाऊसाहेब ब्राम्हणे यांच्या पत्नी लता ब्राम्हणे (वय-६२, रा. चिंचोली फाटा ता. राहुरी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत भाऊसाहेब ब्राम्हणे यांचा मृतदेह शुक्रवारी घोरपडवाडी शिवारात मृतदेह आढळल्याचे समजले. पोलिसांनी याप्रकरणी पंचनामा करत शवविच्छेदन प्रक्रिया केल्यानंतर मयत ब्राम्हणे खिशामध्ये सापडलेली चिठ्ठी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर विषारी औषध प्राषण केल्याने मृत्यु झाल्याचा अहवाल दिला. सापडलेल्या चिठ्ठीमध्ये मयत ब्राम्हणे यांनी आरोपींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले होते.
भाऊसाहेब ब्राम्हणे हे २०१६ मध्ये एचडीएफसी बँकेतून सेवा निवृत्त झाले. मुलगा विशाल ब्राम्हणे हे सिव्हील इंजिनियर असल्याने ते नेहमीच घराबाहेर असतात. दरम्यान, सासरे निवृत्त झाल्यानंतर विशाल ब्राम्हणे यांची पत्नी वर्षा हिने सेवानिवृत्तीच्या रक्कमेतून माझ्या नावे २० लाख रुपये, तसेच एक एकर क्षेत्र नावावर करा असा तगादा लावला. याबाबत समजावून सांगितल्यानंतरही सून वर्षा हिने हट्ट न सोडता वडील, मामा तसेच चुलत दिर यांना हाताशी धरत मयत भाऊसाहेब ब्राम्हणे यांचा मानसिक छळ केला. संबंधितांच्या सांगण्यावरून पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला. त्यामुळे मयत ब्राम्हणे हे वैफल्यग्रस्त झाले होते.
९ डिसेंबर रोजी ते दुपारी घरातून चौकात जाऊन येतो असे सांगून गेले ते परतले नसल्याने पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर खिशातील चिठ्ठी, तसेच सून व नातलगांनी दिलेला त्रास यामुळे संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लता ब्राम्हणे यांनी केली. त्यानुसार राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तक्रार दाखल करून घेत आरोपी वर्षा ब्राम्हणे, चंद्रकांत ओहोळ, सुनिल ब्राम्हणे यांना अटक केली आहे. फरार आरोपी राजेंद्र भोसले यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी दिली.