टेंभुर्णी : ‘तुला घर काम येत नाही, तू नेहमी आजारी असतेस’ असे म्हणत माहेरून पैसे घेऊन ये म्हणून सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ केला जात होता. या सततच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून निवडुंगा येथील विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
सोनाली बालू तायडे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी सोनाली यांची आई ज्योती सुनील शिंदे (रा. उंमरद तालुका जि. जालना) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पती बालू अण्णा तायडे, सासू कांताबाई तायडे, सासरा अण्णा नाथाजी तायडे यांच्यासह नणंद सागरबाई ढिलपे व भागू बोर्डे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडुंगा येथील बालू अण्णा तायडे याच्याशी सोनालीचा विवाह झाला होता. लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले. पण नंतर तुझ्या आई-वडिलांकडून दवाखान्यासाठी पैसे घेऊन ये, असे म्हणून सासरच्यांकडून सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. या छळास कंटाळून सोनाली तायडे हिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.