अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादाक घटना समोर आली आहे. पारनेर तालुक्यातील एका गावात घरात घुसून विवाहितेच्या गळ्याला चाकू लावून तिच्यावर बळजबरी अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. १३) दुपारी घडली आहे. याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर तुळशीराम मेंगाळ (रा. नागापूरवाडी, पळशी, ता. पारनेर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडितेने पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी घरी काम करीत असताना आरोपी बळजबरीने घरात घुसला. पीडित महिला एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्या गळ्याला चाकू लावला. जिवे ठार मारण्याची धमकी देत पीडितेवर बळजबरी अत्याचार केला. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. पीडितेने हा प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक ए. बी. दंडगव्हाळ करीत आहेत.
बलात्कार केल्याप्रकरणी एकाला सक्तमजुरी
अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या गुन्ह्यात श्रीगोंदा जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी धरीत विविध कलमान्वये दहा वर्षे सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा दिली. नकेश ऊर्फ कृष्णा ऊर्फ गणेश छबू माळी (वय २१ रा. शेडाळा, ता. आष्टी, जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी व तिची आई दोघी चिखली येथील भानुदास कोतकर यांच्या शेतात मजुरी करून राहत होत्या.
पीडितेचा मामा चिखली येथील अशोक झेंडे यांच्या शेतात आरोपीसह राहत होता. पोलिस तपासामध्ये आरोपींनी नवे कपडे घेण्याची बतावणी करून पीडितेला पळवून नेऊन अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. पीडितेच्या जबाबावरून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी आरोपीला दोषी धरत शिक्षा सुनावली.