नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून एकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे महिनाभर ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप”मध्ये राहूनही संशयिताने लग्नास नकार दिल्याने हा प्रकार पोलिसांत पोहोचला. याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
अल्तमश जिलानी शहा (वय 20, रा. सादिकनगर, वडाळागाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयिताचे पीडितेशी प्रेमसंबध होते. लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने गेल्या 23 एप्रिल रोजी मुलीस घरातून पळवून नेले होते. द्वारका परिसरातील बागवानपुरा भागात दोघे भाडेतत्वावर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये वास्तव्यास होते.
दरम्यान, मुलीचे आई-वडील व काका तिला भेटण्यासाठी गेले असता संशयिताने लग्नास नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु केला आहे.