सोलापूर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. भाजपने पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते, मात्र, त्यांना भाजपनं डावलले आहे. यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाच्या हालचालींना वेग आला आहे.
आज रविवारी दुपारी अकलूज येथील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर विधान परिषदेचे माजी सभापती अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर आणि शेकापाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला इंडिया आघाडीतील नेते देखील उपस्थित आहेत. यामुळे मोहिते- पाटील बंड करणार की भाजपसोबत राहणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.
दरम्यान, भाजपच्या दुसऱ्या यादीत माढा लोकसभेची उमेदवारी पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देण्यात आली आहे. त्यामुळे मोहिते पाटील आणि रामराजे यांच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागले होते. उमेदवारी जाहीर झाल्यापासून मोहिते- पाटलांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र कार्यकर्त्यांमधून विविध पोस्ट व्हायरल केल्या जात होत्या.
अकलूजमध्ये इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थिती
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. दुपारी रामराजे निंबाळकर आणि त्यांचे बंधू संजीव निंबाळकर दोघेही एकाच गाडीतून शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले आहेत. भाजपकडून इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांचे स्वागत केले आहे. तसेच इंडिया आघाडीचे राज्य समन्वयक तथा शेकापाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील ही त्या बैठकीला उपस्थित राहिले आहेत.
याशिवाय करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, सांगोल्यातील शेकापाचे डॉ. अनिकेत देशमुख, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, सातारा डीसीसी सेवाई चेअरमन अनिल देसाई यांच्यासह शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख, अनिकेत देशमुख यांच्यासह शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे उपस्थित आहेत. दरम्यान, या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.