मनमाड : पानेवाडी रेल्वे स्थानकाजवळील इंधन कंपन्यांच्या डेपोतून इंधन तस्करी जोरात सुरू असल्याची चर्चा असतानाच गुरुवारी (दि. १६) दुपारच्या सुमारास इंधनाने भरलेल्या रेल्वे वॅगन्समधून पेट्रोलची चोरी करताना सहा संशयितांना पकडण्यात आले. याप्रकरणी सर्व संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे, रेल्वेच्या इंधन वॅगनवर डल्ला मारणारे संशयित रेल्वे कर्मचारी असल्याची बाब समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, कुंपणाच शेत खात असेल, तर रक्षण कोण करणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पानेवाडी, नागापूर शिवारात विविध तेल कंपन्यांचे इंधन डेपो आहेत. येथून टँकर्सद्वारे उत्तर महाराष्ट्रात आणि रेल्वेद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यांत इंधनाची वाहतूक होते. या इंधन कंपन्यांच्या प्रकल्पालगत रेल्वेच्या वॅगन्समध्ये डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी रेल्वेचे स्वतंत्र टर्मिनल आहे. इंधनाने रिकामी आणि भरलेली रेल्वे रैंक सायडिंगला उभी केल्यानंतर वॅगनमधील पेट्रोल आणि डिझेल कॅनमध्ये भरून क त्याची चोरी होत असल्याची माहिती मनमाड रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने पानेवाडी येथे धाव घेऊन सापळा लावला. यावेळी संशयित सहा कर्मचारी रेल्वे वॅगनमधून इंधन चोरी करताना आढळून आले. त्यांच्याकडे प्लास्टिक कॅनमध्ये भरलेले ४० लिटर पेट्रोल, डिझेल मिळून आले. याबाबत सहा जणांविरोधात आरपीएफ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व सहा संशयितांना अटक करण्यात आल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
इंधन चोरट्यांना रोखण्याचे आव्हान
रेल्वेस्थानकालगत विविध तेल कंपन्याचे डेपो असून, या डेपो परिसरात इंधन तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याची चर्चा आहे. इंधन चोर रेल्वे कर्मचाऱ्यांना हाताशी धरून रात्री इंधन चोरी करीत असल्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. मात्र, सुरक्षा यंत्रणांच्या उदासीनतेमुळे चोरटे पकडले जात नसल्याची चर्चा सुरू असून, या भागात इंधन चोरट्यांचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या भागातील इंधन तस्करी रोखण्याचे आव्हान रेल्वे सुरक्षा दलासमोर निमाण झाले आहे.