नाशिक : राज्यात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महाविकास आणि महायुतीकडून जोरदार प्रचारसभा, मिरवणुकी काढल्या जात आहे. त्यातच आता नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत वाद झाल्याचे दिसून येत आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून नाशिक पूर्व मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. या मतदारसंघातून भाजपने विद्यमान राहुल ढिकले यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गणेश गीते निवडणुकीच्या रिंगणात आहे. सुरुवातीला या मतदारसंघात डमी उमेदवार उभा केल्याचा आरोप गणेश गीते यांच्याकडून करण्यात आला होता. या पाठोपाठ आज भारतीय जनता पक्षाची रॅली सुरु असताना गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांकडून पैशाचे वाटप सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
नाशिक पूर्वमध्ये वाद टोकाला..
राहुल ढिकले यांचे कार्यकर्ते गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांच्या इथे पोहोचले. यानंतर दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची होऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी गणेश गीते यांचे कार्यकर्ते पैशांचे वाटप करत असल्याचा आरोप केला. तर गणेश गीतेंच्या कार्यकर्त्यांकडून आमच्यावर हल्ला करण्यात आला. आमच्या गाड्या फोडल्या, असा आरोप केला. आता हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले आहे. महाविकास आघाडीचे नाशिकमधील इतर उमेदवार पोलीस ठाण्यात दाखल होणार आहेत.
सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया देऊन त्यांनी आपली सभा रद्द करून त्या नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. ही खूप चिंताजनक बाब असून हे अतिशय गलिच्छ राजकारण सुरु आहे. आता मी पहिले पोलीस स्टेशनला जाणार आहे. आमच्या कुटुंबातील माणसांवर असे हल्ले होणार असतील तर आम्ही खपवून घेणार नाही. पोलीस प्रशासन काय करत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.