अहमदनगर : तलाठी भरती प्रक्रियेबाबत भ्रष्टाचार झाला असल्याची टीका रोहित पवार यांनी केली होती. त्यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधत रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु असल्याचं म्हटलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील प्रसारमाध्यमांशी बोलतांना हे वक्तव्य केले आहे.
नेमकं काय म्हणाले?
तुम्ही एखादं बेताल वक्तव्य करता, पण, जाहीरपणे त्याचे पुरावे मांडा, तुम्ही कोणाचे नातेवाईक आहे म्हणून तुम्हाला काहीही बोलण्याचे लायसन्स मिळालेलं नाही. पूर्वी आजोबा विधान करायचे आता नातवान परंपरा पुढे नेण्याचे ठरवले आहे. आम्ही महसूल विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु केलेली आहे. त्यामुळे पुरावे द्या अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा असं वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे.
मला शरद पवारांनी राजकारणात येऊ दिलं नाही म्हणून अजित पवारांचा मार्ग सुकर झाला असं वक्तव्य राजेंद्र पवारांनी केलं आहे. याबाबत बोलतांना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मी त्यांचं विधान ऐकलं नाही. मात्र, रोहित पवारांना तो सूचक इशारा असला पाहिजे की, फार धावपळ करू नको जशी अजित दादांची फसवणूक झाली. तशी तुझी देखील फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. हेच त्यांना त्यांच्या वक्तव्यातून सूचित करायचे असेल असे मला वाटते असं टोला राधाकृष्ण विखेंनी लगावला आहे.