अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजय संकल्प सभेची जय्यत तयारी महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे. मोदींच्या स्वागतासाठी नगर शहर सज्ज झाले आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी याच मैदानावरून मोदींनी संबोधित केले होते. या आठवणींना उजाळा देऊन जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा निर्धार पुन्हा एकदा या ऐतिहासिक सभेतून होणार आहे.
शहरातील निरंकारी भवना शेजारील मैदानावर मंगळवार ७ मे रोजी दुपारी १ वा. ही सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ या महासंकल्प विजय सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी मैदानावर भव्य सभामंडप उभारण्यात आला असून, १ लाख नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था या मंडपात करण्यात आली आहे. उन्हाची तिव्रता लक्षात घेऊन सभामंडपामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सभेचे नियोजन करण्यात येत आहे.
शहरातील महायुतीचे सर्व पदाधिकारी सभेच्या यशस्वीतेसाठी नियोजन करीत आहेत. भव्य अशा स्टेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यानंतर ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील. संपूर्ण जिल्ह्यातून या सभेला नागरिक येणार असल्याने चौदा वेगवेगळ्या ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे.