नंदुरबार : बिअरबारपासून सुमारे ७५ मीटर अंतरावर असलेली शाळा बंद पडल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी ४० हजार रुपये व शाळेची आरटीई मान्यता वर्धित करुन दिल्याच्या मोबदल्यात १० हजार असे एकूण ५० हजाराची लाच स्विकारताना नंदुरबार येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश सुरेश चौधरी यांना नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगहात पकडले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना नवापूर शहरातील नगर पालिका हद्दीत सीटीसर्व्हे क्र.६२४ अंतर्गत पंचरत्न शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरु करावयाचे असल्याने या परिसरात ७५ मीटर अंतरावर जिल्हा परिषदेची शाळा होती. यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाना देण्यास हरकत घेतली होती. परंतु, सदर शालेय इमारत ही जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभागाकडून सदर शाळा बंद असल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता. मात्र, सदर प्रमाणपत्र देण्यासाठी नंदुरबार प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश सुरेश चौधरी यांनी ४० हजार रुपयांची मागणी केली होती.
तसेच अशरफभाई माजिदभाई लखानी, अल्पसंख्यांक विकास बहुउद्देशिय संस्था नवापूर या संस्थेंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक विद्यालय नवापूर शाळेची आरटीई मान्यता वर्धित करण्याचे काम करुन दिल्याच्या मोबदल्यात बक्षिस म्हणून १० हजार रुपयांची मागणी केली होती. अशा दोन्ही कामांच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची मागणी करुन बुधवारी (दि. १५) जिल्हा परिषद इमारतीतील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच सदर ५० हजार रुपयांची रक्कम स्विकारताना सतीश चौधरी यास नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी संशयित चौधरींविरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.