जळगाव : आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर माझ्याकडे उपाय आहे, मात्र आताच्या या चोरांसमोर ते मांडलं तर हे त्याचं खोबरं करतील. म्हणून मी ते मांडणार नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जळगावमध्ये केले. निवडणुका होऊन नवीन सत्ताधारी येऊ द्या, त्यानंतर त्यांना सांगता येईल की आरक्षणाचा मुद्दा कसा हाताळायचा. तो हाताळत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कसा हाताळायचा हे मी त्यांना सांगेल. परंतु, आताच्या सत्ताधाऱ्यांना सांगणार नसल्याचे प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
तसेच मंत्री गिरीश महाजन यांनी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे, अॅड. जनरल कुंभकोणी यांनी यशस्वीरित्या मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात खटला लढवला. मात्र, त्यांच्या सरकारने कुंभकोणी यांना पुढे परत काम का करू दिले नाही? त्या केसमध्ये लक्ष घालू नका, हजर राहू नका हे आदेश का दिले. हे गिरीश महाजन यांनी सांगितलं पाहिजे. याचे उत्तर महाजन यांनी द्यावं म्हणजे त्यांच्या दीर्घकालीन आरक्षणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवता येईल असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.