नाशिक : गेल्या दोन दिवस झाले राज्यात पावसाने हैदोस घेतला आहे. पावसाचा फटका हा नाशिक शहरासह जिल्ह्यालाही बसला आहे. अशातच आता नाशिक शहरातुन एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत आहे. रामकुंड परिसरातून 29 वर्षीय युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. मुसळधार पावसाने आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदावरी नदीपात्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आईच्या डोळ्यादेखतच युवक वाहून गेल्याने आईने एकच टाहो फोडला. यामध्ये एका तीन वर्षीय मुलीला वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले आहे.
गंगापूर धरणातून आज दुपारी 12 वाजता एकूण 500 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आले आहे. तर दुपारी 3 वाजता एकूण 1 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच पावसाचा जोर कायम असल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
डोळ्या देखत पोरगा गेला वाहून
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदावरी नदीपात्रात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच रामकुंड येथे 29 वर्षीय पर्यटक वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 29 वर्षीय पर्यटकाला शोधण्यासाठी प्रशासनाचे शोध कार्य सुरू आहे. तर तीन वर्षाची मुलगीदेखील पाण्यात पडली होती. मात्र, तिला वाचवण्यात जीव रक्षकांना यश आले आहे.
.. तरच घराबाहेर पडावे : दादा भुसे
राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. नदी काठावरील नागरिकांनी पुराची पातळी लक्षात घेवून आपले पाळीव प्राण्यांची देखील सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून सर्वोतोपरी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सरकारी यंत्रणा फिल्डवर आहेच मात्र नागरिकांनी देखील सतर्क राहत गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.