नाशिक : जिल्ह्यातील नामांकित ग्रामपंचायतींमध्ये समाविष्ट असलेल्या पिंपळगाव बसवंत (ता.निफाड) ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिका १२ जून २०२४ रोजी निकाली निघाली असून, न्यायालयाने नगरविकास विभागाला ११ सप्टेंबर २०२४ पर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याआधारे आता ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतराचा प्रस्ताव जिल्हा नगरविकास विभागाने राज्य सरकारकडे पाठविला आहे, पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीची निवडणूक डिंसेबर २०२२ मध्ये पार पडली.
अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या पॅनलचा एकच सदस्य निवडून आल्याने त्यांना पराभवाचा धक्का बसला. त्यांच्या विरोधी गटातील भास्कर बनकर यांचे तब्बल १२ सदस्य निवडून आल्याने एकहाती सत्ता त्यांना मिळाली. सत्ता स्थापन होऊन दीड वर्ष होत नाही तोच आता उच्च न्यायालयाचा निकाल लागल्याने ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे.
यासाठी आ. दिलीप बनकर यांनी नगरविकास विभागाला पत्रही दिले होते. पिंपळगाव ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर करण्याचा प्रस्ताव गेल्या २० वर्षांपासून अडकला होता. नगरपरिषदेचा दर्जा दिला जात नसल्याने सामाजिक कार्यकर्ते सतीश मोरे यांच्या वतीने अॅड. रामचंद्र गिते यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ११ सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने आणि आता नगरविकास विभागाने तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविल्याने ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ आपोआप संपुष्टात येणार आहे.