अकोला : राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. असे असताना मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अकोल्यामध्ये घडली आहे. पतीच्या मित्राकडून विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचार व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात घडली आहे. अक्षय बनसोडे (वय 23) असे या आरोपीचे नाव आहे. अक्षय बाळापूर शहरातील विवाहित महिलेच्या पतीचा मित्र आहे. पीडित महिलेचा पती घरी नसताना अक्षय तिच्या घरी गेला होता.
पीडित महिलेच्या पतीच्या अनुपस्थितीत (दि. 2 ते 29 जून) दरम्यान घरी गेल्यानंतर त्याने संबंधित महिलेचे फोटो व व्हिडिओ काढले. त्यानंतर त्या महिलेचे काढलेले फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आणि त्यानंतर शरीरसुखाची मागणी करून महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आरोपी अक्षय बनसोडे याने पीडित महिलेला पैशांची मागणीही केली. जर महिलेने पैसे दिले नाहीतर तिची बदनामी केली जाईल, अशी धमकी फिर्यादी महिलेस दिली. ही बाब पीडित महिलेने पतीला सांगितली.
यावेळी पतीने पत्नीने सांगितलेल्या घटनेसंदर्भात बाळापूर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. पतीच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी अक्षय बनसोडे या तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.