नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी पाऊल उचलायला सुरूवात केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून जिल्हा बँकेकडून थकीत कर्जाप्रकरणी भुजबळ कुटुंबीयांना नोटीस पाठवण्यात आली आहे. थकीत कर्ज वसुलीची नोटीस माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे भुजबळ कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भुजबळ कुटुंबीयांच्या मालकीच्या दाभाडी येथील आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या साखर कारखान्याकडे 51 कोटी 66 लाख रुपयांची थकबाकी आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी कारखाना स्थळावर जाऊन नोटीस चिकटवली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचे संचालक असलेल्या समीर व पंकज या भुजबळ बंधूना देखील नोटीस पाठवण्यात आली आहे. कारखान्यासाठी जिल्हा बँकेकडून नोव्हेंबर 2011 मध्ये 30 कोटींचे कर्ज घेतलेले होते, त्यापैकी 18 कोटींची नियमित कर्ज परतफेड करण्यात आली. परंतु, सन 2013 पासून कारखान्याकडील 12 कोटी 12 लाख थकीत मुद्दल व व्याज 39 कोटी 54 लाख, असे एकूण 51 कोटी 66 लाख रुपये थकीत आहे.
पंकज-समीर भुजबळांना नोटीस
तसेच कारखान्याचे संचालक असलेले पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासह सत्येन आप्पा केसरकर यांनाही नोटीस बजावली आहे. तीन वर्षांपासून बँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे बँकेने थकबाकी वसुलीसाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.