अहमदनगर : अहमदनगर येथील नेप्ती कांदा मार्केट समोर कांदा व्यापार्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर व्यापार्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याच्या जवळील तब्ब्ल 50 लाख रुपयांची रोख रक्कम दरोडेखोरांनी पळवून नेली आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. समीर सय्यद असं हल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
आडत आणि कांदा व्यापारी समीर सय्यद हे नेप्ती मार्केटकडे येत होते. त्यावेळी बायपास रोडवर त्यांना काही दरोडेखोरांनी अडवले. यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांच्याकडील 50 लाखांची रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या प्राणघातक हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने अहमदनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डीले म्हणाले की, शेतकऱ्याला बाजार समितीत रोख रक्कम द्यावी लागते. त्या शेतकऱ्याने सुमारे 50 ते 60 लाख रुपये बँकेमधून काढून आणले होते. नेप्ती बाजार समितीचा आज लिलाव असल्याने ते आज बाजार समितीत येथ होते. यावेळी चार-पाच हल्लेखोरांनी शेतकऱ्याला मारहाण केली. त्याच्यावर वार करून रक्कम घेऊन लंपास झाले. याबाबत आम्ही एसपींची भेट घेऊन तातडीने या प्रकरणाचा तपास करून आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी करणार आहोत.
या घटनेबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप म्हणाले की, बाजार समिती परिसरात सातत्याने छोट्या मोठ्या घटना घडत असतात. याबाबत अनेक तक्रारी देखील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या आहेत. आजही एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत सुदैवाने ते बचावले. मात्र, त्यांच्याकडील मोठी रक्कम दरोडेखोरांनी पळवून नेली आहे. याबाबत लवकरात लवकर तपास लागला नाही, घटनेतील आरोपींवर योग्य ती कारवाई झाली नाही, तर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संग्राम जगताप यांनी दिला आहे.