नाशिक : डिसेंबरच्या प्रारंभी लाल कांद्याला ५४ ते ५५ रुपये प्रतिकिलो दर मिळत होता. आता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये आवक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्याचा परिणाम बाजारभाव घसरण्यावर झाला आहे. १० ते १५ दिवसांत घाऊक बाजारात कांद्याचे सरासरी दर जवळपास १५०० रुपयांनी घसरले आहेत. सध्या किरकोळ बाजारात कांदा ३०-४० रुपये किलोपर्यंत विकला जात असला, तरी शेतकऱ्यांना मात्र सरासरी १९५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लासलगावसह इतर बाजार समित्यांमध्ये कांद्याला कमाल ५४००, तर सरासरी ३७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. तोच कांदा १५ दिवसांत कमाल ३२००, तर सरासरी दोन हजार रुपयांवर आला आहे. सध्या लाल कांद्याची होणारी प्रचंड आवक लक्षात घेता केंद्र सरकारने तातडीने निर्यातीवरील शुल्क रद्द केल्यास त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
निर्यात शुल्क रद्द केल्यानंतर बाजारभाव स्थिर राहण्यास मदत होईल, दररोज बाजारभावांमध्ये घसरण होत असल्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कांद्याचे दर वाढू लागले की केंद्र सरकार जी तत्परता दाखवते, ती तत्परता कांद्याचे दर घसरल्यावर का दाखवत नाही, असा मुद्दा शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. एका आठवड्यात कांद्याचे प्रतिक्विंटल दोन हजार रुपये नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे.