अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास राहिलेले असतानाच आता एक मोठी बातमी समोर अली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांच्या कंपनीतील एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीचे अधिकारी मोहिते याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे काही प्रमाणात रोकड सापडल्याची माहिती समोर आली आहे. पैसे वाटप केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यांचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्याकडून कर्जत-जामखेड मतदारसंघात पैशांचं वाटप सुरु असल्याचा आरोप भाजपने केला आहे. बारामती अॅग्रोच्या अधिकाऱ्यांकडून कर्जत जामखेडमध्ये हे पैशांचे वाटप सुरु असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हॅण्डलवरून रोहित पवार यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने दखल घेऊन त्वरित कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे.
ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीचे अधिकारी पैसे वाटत असल्याचं उघड झालं आहे. या अधिकाऱ्यांकडे दारूसाठी किती पैसे आणि कुणाला द्यायचे किती याचा तपशील आहे. मतदारांची यादी आणि पैशांचं घबाडही सापडलं आहे. निवडणूक आयोगानं यावर त्वरीत कारवाई करावी, आणि सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी मूग गिळून गप्प बसू नये असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच काही फोटो देखील ट्वीटवर शेअर केले आहेत.