नाशिक : राज्यात मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. बदलापूर येथील घटना ताजीच असताना आता नाशिक जिल्ह्यातही अशाच एका प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याचे समोर येत आहे. घरासमोर खेळत असलेल्या साडेचार वर्षीय चिमुकलीचे एका नराधमाने अपहरण केले. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली ही सिन्नर तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ती घरासमोर खेळत होती, गावातीलच एका व्यक्तीने तिचे अपहरण करून तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. बराच वेळ होऊनही चिमुकली घरी न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोधा घेतला असता तेव्हा संशयित आरोपी हा चिमुकलीसोबतच होता. मात्र पीडितेच्या कुटुंबियांना पाहून तो पळून गेला.
यावेळी चिमुकली रडताना दिसून आली. तेव्हा चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा संशय कुटुंबियांना आला. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.