पंचवटी : परिवहन विभागांतर्गत मोटर वाहन विभागातील मोटर वाहन निरीक्षक संवर्गातील ४२ अधिकाऱ्यांना गट ‘अ’ या पदावर पदोन्नती मिळाली आहे. यात नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाला सचिन बोधले, महेश देशमुख आणि श्रीनिवास जेल्लावार हे तीन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी मिळाले आहेत.
अनेक वर्षांपासून परिवहन विभागातील (आरटीओ) अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते. यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि मोटर वाहन निरीक्षकांचा समावेश होता. जून २०२४ मध्ये राज्यातील २३ उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली होती. त्यानंतर याच महिन्यात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळून ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नियुक्त झाले.
यात नाशिकमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून राजश्री गुंड यांनी नुकताच पदभार स्वीकारला. तर सोमवारी राज्यातील ४२ मोटर वाहन निरीक्षकांना सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर पदोन्नती दिली आहे.