पुणे: नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी संदीप कर्णिक यांची नाशिक पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप कर्णिक यांनी यापूर्वी पुण्याचे पोलीस सहआयुक्त म्हणून कार्यरत होते. तर, अंकुश शिंदे यांची राज्य गुप्तवार्ताच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.
नाशिकचे विद्यमान पोलीस आयुक्त (Nashik Police Commissioner) अंकुश शिंदे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली आहे. पुण्याचे सहआयुक्त संदीप कर्णिक हे नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. अंकुश शिंदे यांनी डिसेंबर २०२२ मध्ये नाशिक पोलीस आयुक्ताचा पदभार स्वीकारला होता. आता त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पुण्याचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आलेली आहे. संदीप कर्णिक यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियर पदवी प्राप्त केली. ते 2004 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी अहमदनगर, ठाणे, नागपुर, जालना, नांदेड यासह पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.