नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावर सशस्त्र दरोडा घालण्यात आला आहे. डोळ्यात मिरचीची पूड टाकून तब्बल तीन कोटींचा ऐवज दरोडेखोरांनी लुटल्याची माहिती मिळत आहे. आज गुरुवारी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक- मुंबई महामार्गावरून गुरुवारी सोने आणि चांदीचे दागिने घेऊन जाणारी एक कुरिअर सर्व्हिसची इको जात होती. यावेळी 4 ते 5 अज्ञात व्यक्तींनी फिल्मी स्टाईलने माणिकखांब जवळ चोरी केली. कुरिअर सर्व्हिस इको गाडीच्या पुढे आणि मागे गाडी आडवी लावली. गाडीतील व्यक्तींना शस्त्राचा धाक दाखवला. या दरोड्यात 3 कोटी 67 लाख 50 हजारांचा एवज लंपास केला.
डोळ्यात मिरचीची पूड टाकली
दरोडेखोरांनी इको गाडीला थांबवत चालक आणि त्याच्या सहकाऱ्याला गाडीबाहेर काढले. त्यानंतर त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. गाडीतील साडेतीन किलो सोने आणि चांदीच्या दागिन्यांवर चोरांनी डल्ला मारला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
3 कोटी 67 लाख 50 हजारांचा ऐवज लंपास
यात 66 लाख रुपये किमतीचे 1 किलो 100 ग्राम वजनाचे 11 बिस्कीट, 20 लाख 40 हजार किमतीचे 3 किलो 400 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 65 लाख रुपयांचे प्रत्येकी 30 किलो वजनाच्या 3 चांदीच्या विटा, 32 लाख 50 हजार रुपयांचे 45 किलो वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 3 कोटी 67 लाख 50 हजार रुपये किमतीचे ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला आहे. माणिकखांब ते मुंडेगाव दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.