नाशिक : नाशिकमधील सापुतारा घाटामध्ये एक भीषण अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण आहे कि बस थेट दरीत कोसळली आणि त्यात 2 जण ठार तर 58 जण जखमी झाले आहेत. बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. ही संपूर्ण अपघाताची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
असा घडला अपघात..
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही गुजरातमधील सुरतच्या बापा सीताराम ट्रॅव्हल्सची आहे. ही लक्झरी बस 60 प्रवाशांना घेऊन परत जात असताना हा अपघात घडला आहे. या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याचं दिसून येत आहे. सुरतमधील चौक बाजार- उथना येथील प्रवाशांना घेऊन जाणारी बापा सीताराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस क्रमांक जीजे 05 बी. टी. 9393 ही बस रविवारी सापुतारा येथे गेलेल्या प्रवाशांना घेऊन सापुतारा-मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरून जात होती.
सायंकाळी सहाच्या सुमारास घाटात एक अवघड वळण घेताना लक्झरी बस चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि बस संरक्षण भिंतीला धडकून दरीत कोसळली.
ही बस दरीत कोसळल्यानंतर लोक मदतीसाठी धावले. सुदैवाने ही बस संपूर्णपणे दरीत न कोसळता उतारावरील एका झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघाताची माहिती मिळताच 108 चे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमी प्रवाश्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांकडून सध्या अपघाताची चौकशी सुरु आहे.