नाशिक : नाशिक येथील खुटवडनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पैशांची मागणी करुन ब्लॅकमेल करणा-या दोन तरुणी व एका तरुणाच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने सुसाईड नोट लिहिली असून, यात ब्लॅकमेलिंग करणाऱ्या सर्व आरोपींची नावे लिहिली आहेत. ही घटना खुटवडनगर परिसरातील कार्तिकेयनगरमध्ये मंगळवारी रात्री घडली आहे.
रोशन बाळासाहेब कुयटे (वय 22, रा. कार्तिकेयनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
याघटनेसंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.01)सकाळी कुयटे हे घरी असताना त्यांचा भाऊ ललित बाळासाहेब कुयटे (वय-33) हा सकाळी त्याच्या रुममधून बाहेर आला नाही म्हणून त्यांनी गॅलरीत जाऊन त्याच्या रुमची खिडकी उघडून पाहिली असता ललित हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याने ही माहिती अंबड पोलीसांना कळवली. तात्काळ पोलीसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह खाली उतरवला.
काय लिहिले होते सुसाईड नोटमध्ये ?
रोशनच्या पॅन्टच्या खिशात एक सुसाईड नोट आढळली. यामध्ये रोशनची मैत्रीण संशयित जिज्ञासा पाटील नवरे, तिचा प्रियकर ओमकार शिंदे आणि आणखी एक मैत्रीण मोना (पूर्ण नाव आणि पत्ता माहीत नाही) यांनी रोशनकडे वारंवार पैशाची मागणी केल्याचे म्हटले आहे. तसेच मोना नावाच्या मैत्रिणीकडे मृत रोशनचे रेकॉर्डिंग असल्याने तिघेही जण ब्लॅकमेल करून वारंवार पैसे मागत असल्याचाही उल्लेख आहे. मैत्रीण जिज्ञासा आणि तिचा मित्र ओंकार याला रोशनने रोख 40 हजार रुपये दिले होते. त्याचप्रमाणे रोशनने दोन्ही संशयितांना गाडीसाठी प्रथम 70 हजार रुपये आणि नंतर 1 लाख रुपये रोख स्वरूपात दिले. तरीही ते वारंवार पैशांची मागणी करत असल्याने अखेर कंटाळून आत्महत्या करत असल्याचे रोशनने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.