नाशिक: स्थानिक उत्पादनाला चालना द्या, मेड इन इंडिया उत्पादनाला प्राधान्य द्या. जीवनात कुठल्याही ड्रग्सच्या आहारी जाऊ नका. तुमच्या जीवनापासून ते कायम दूर ठेवा. आई बहिणींवरून अपशब्द, शिवीगाळ केली जात असेल तर त्याविरोधात आवाज उठवा आणि ते बंद करा. आपल्या देशातील प्रत्येक युवा त्यांची जबाबदारी निष्ठेने आणि सामर्थ्याने पूर्ण करेल, हा विश्वास आहे. सशक्त भारताची जी ज्योत आम्ही पेटवली आहे ती अमृतकाळात अमरज्योत बनवा अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी म्हणाले की, माझा सर्वात जास्त विश्वास भारताच्या युवा पिढीवर आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून ज्या पद्धतीने युवक जोडला जातोय, त्यामुळे मी खूप उत्साहित आहे. ‘मेरा युवा भारत’ संघटनेच्या स्थापनेनंतर हा पहिला युवा दिन आहे. या संघटनेला स्थापन होऊन ७५ दिवसही पूर्ण झाले नाही, तोच आतापर्यंत १ कोटी १० लाख युवकांनी नोंदणी केली आहे. युवकांचे सामर्थ्य, सेवाभाव देशाला, समाजाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहे. तुमचे प्रयत्न, मेहनत ही युवा भारताच्या शक्तीचा संपूर्ण जगात झेंडा फडकणार आहे. आमच्या सरकारला देखील दहा वर्ष पूर्ण आहेत. या दहा वर्षात सरकारने युवकांच्या पंखाना बळ देण्याचं काम केले आहे. शिक्षण, रोजगार, स्टार्टअप, कौशल्य विकास यासारख्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात आधुनिक इको सिस्टम तयार करत आहोत असंही मोदी यांनी सांगितले.
तसेच देशात नवनवीन आयआयटी, एनआयटी सातत्याने खुले होत आहेत. आज पूर्ण जग भारताला कौशल्य विकासाच्या दृष्टीने पाहात आहे. परदेशात जाणाऱ्या युवकांसाठी केंद्र सरकार प्रशिक्षण देत आहे. फ्रान्स, जर्मनी, यूके, इटली, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांसोबत भारत सरकारने करार केले आहेत. त्याचा लाभ भारतीय युवकांना मिळत आहे. सरकार प्रत्येक क्षेत्रात ताकदीने काम करत असून व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक सेक्टर विकसित करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. मागच्या सरकारच्या तुलनेत तिप्पटीने काम केले जात आहे. नवे महामार्ग, नव्या ट्रेन्स कुणासाठी बनतंय तर ते युवकांच्या विकासासाठी होत आहे, असंही मोदी यांनी म्हटले.
देशाच्या भविष्यासाठी मतदान करा
देशातील युवा पिढी ही गुलामीच्या प्रभावापासून मुक्त आहे. विकास आणि वारसा युवकांना हवा आहे. योग, आयुर्वेद ही भारताची ओळख आहे. स्वातंत्र्यानंतर या गोष्टी विस्मरणात गेल्या परंतु आज जगात हीच आपली ओळख बनत आहे. मी जेव्हाही ग्लोबल नेत्यांना भेटतो तेव्हा मला त्यांच्यात मोठी आशा दिसते. भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत युवकांची भागीदारी जितकी जास्त असेल तितके राष्ट्रासाठी मोठे योगदान असेल. जर युवा सक्रीय राजकारणात आले तर घराणेशाही संपुष्टात येईल. घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचे किती नुकसान झाले हे सगळ्यांना माहिती आहे. तुमची भूमिका मतांच्या माध्यमातून जाहीर करा. पहिल्यांदा मतदान करणारे युवा देशाच्या विकासात योगदान देऊ शकतात. देशाच्या भविष्यासाठी तुम्हाला मत देणे गरजेचे आहे. पुढील २५ वर्षाचा अमृतकाळ तुमच्यासाठी कर्तव्यकाळ आहे.
अटल सेतूचे लोकापर्ण
मुंबईला रायगडशी जोडणाऱ्या शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. देशातील सर्वांत मोठा सागरी सेतू म्हणून प्रचिती असलेल्या या सेतूबद्दल नरेंद्र मोदी यांनी गौरवोद्गार काढले. तसेच अटल सेतूबाबत बोलताना त्यांनी काँग्रेसच्या काळात बांधलेल्या वांद्रे-वरळी सीलिंकशी याची तुलना केली. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीकास्र डागलं.
“आज जगातील सर्वांत मोठा विशाल अटल सेतू देशाला मिळाला. भारताच्या विकासासाठी आम्ही सागराशीही मुकाबला करू शकतो. लाटांविरोधात लढू शकतो. आजचा कार्यक्रम संकल्पातून सिद्धीचे परिमाण आहे. २४ डिसेंबर २०१६ चा दिवस विसरू शकत नाही. या दिवशी अटल सेतूच्या भूमिपूजनासाठी आलो होतो. तेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून म्हटलं होतं की लिहून ठेवा, देश बदलेलही आणि देश पुढेही जाईल”, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.