नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. या अपघातामध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने 100 हून अधिक मेंढ्याना चिरडले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यातील विजापूर येथील मेंढ्यांचे मालक लखा गोविंदा गोईकर, बाळु सोमा गोईकर, दगडु गोईकर (रा.विजापूर ता.साक्री जि.धुळे) हे मेंढपाळ विसरवाडीच्या दिशेने गुजरात राज्यात मेंढ्या घेऊन जात होते. त्याचवेळी आंध्र प्रदेश राज्यातील ट्रकचालक रमेश दुगंला (राजू) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावर अक्षरशः रस्त्यावरील मेंढ्यांना चिरडले. त्यात 100 हून अधिक मेंढ्या चिरडल्या गेल्या.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घटनास्थळावरून पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले. यावेळी मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यूने मेंढपाळांनी मोठा आक्रोश व्यक्त केला.
ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे मेंढ्या चिरडल्या गेल्याचा आरोप मेंढपाळाने केला. आरोपी ट्रक चालकावर कठोर कारवाई करत नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी मेंढपाळाने केली आहे. दरम्यान, कोंडाईबारी घाटात वारंवार अपघात होत असतात. मात्र, यावर उपायोजना करत नसल्याचे दिसून येत आहेत. या अपघताचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.