Nandur madhyameshwar bird sanctuary : नाशिक : निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात परदेशी तसेच स्थलांतरीत पक्षी येण्यास सुरूवात झाली आहे. बदलते वातावरण, अभयारण्य परिसरात अन्न पदार्थाची असणारी मुबलकता पाहता दोन ते तीन वर्षांपासून गायब असलेले पक्षी दिसू लागले आहेत. यंदा पक्ष्यांची संख्या विक्रमी असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पर्यटकांची गर्दी अपेक्षित
दरम्यान, पक्षी पाहण्यासाठी अद्याप पर्यटकांची अपेक्षित गर्दी होत नसली तरी ती वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी पर्यटकांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून वनविभागाच्यावतीने आवश्यक सुविधा देण्यात येत आहेत. पक्षी निरीक्षणासाठी मनोरे, स्पोटिंग स्कोप अशा सुविधा उपलब्ध आहेत. वनविभागाकडून नेचर ट्रेलही सुधरवण्यात आल्याने पर्यटकांना पक्ष्यांना त्रास न होऊ देता अभयारण्यात फिरता येणार आहे.
कोणते पक्षी स्थलांतरीत होतात
पूर्व सायबेरियामधून थापट्या, उत्तर युरोपमधून तलवार बदक, सायबेरियामधून कौंच, रशिया आणि युरोपमधून पट्ट कादंब, लडाख परिसरातून चक्रवाक, हिमालय आणि उत्तर युरोपमधून चक्रांग बदक आणि लालसरी, हिमालय परिसरातून नकटा, पूर्व युरोप आणि उत्तर आफ्रिका मधून नयनसरी बदक, इंग्लंडमधून दक्षिण आफ्रिकेकडे प्रवास करणारा लेसर व्हाईटथ्रोट, युरोपमधील मिशीवाला वटवट्या आणि गडवाल, युरोप आणि आशियातील समशितोष्ण प्रदेशात प्रजनन करणारा युरेशियन राईनेक, पूर्व सायबेरियातील युरेशियन विजन आदी पक्ष्यांचे आगमन झाले आहे.
याशिवाय, चतुरंग, सुरय, झोळीवाला, करकोचे, शराटी, तुतारी, गल, चिलखे, चमचा बदक, बगळे, चांदवा, कमळपक्षी, पाणकोंबडी, मुग्धबलाक, खंड्या, ससाणे, पाणबुडी हे पक्षी या अभयारण्यात बघायला मिळतात. जलाशयाजवळ गवतीमाळ असल्याने आणि मोठ्या प्रमाणात वृक्ष असल्याने अनेक प्रजातींचे लहान-मोठे स्थानिक, स्थलांतरित पक्ष्यांचा वावर दिसून येत आहे.