शेवगाव : तालुक्यातील शहर टाकळी येथे लक्ष्मीदेवीच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणुकीदरम्यान जुन्या वादातून एका तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अक्षय संजय आपशेटे या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास केला जात आहे.
शहर टाकळी येथील लक्ष्मीदेवीची यात्रा होती. रात्री साडेदहाच्या सुमारास छबिना मिरवणूक सुरू होती. त्यावेळी जुन्या भांडणावरून सात ते आठ जणांनी येथील अक्षय संजय आपशेटे (वय 24) याच्यावर सशस्त्र हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. जखमी अक्षयला उपचारासाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला.
अक्षयचे भाऊ संकेत संजय आपशेटे (वय 28) यांनी फिर्याद दिली. त्यामध्ये म्हटले आहे, की तो व त्याचा चुलतभाऊ अनिकेत आपशेटे यात्रा पाहण्यासाठी रात्री गेला होता. तेथे आरडाओरडा ऐकू आला. तेथे जाऊन पाहिले तेव्हा माझा भाऊ अक्षय याला गावातील अजय दाविद कोल्हे, किरण उत्तम चव्हण, पंकज लक्ष्मण कोल्हे, अविनाश साईनाथ पवार, विलास संजय कोल्हे आणि इतर तीन ते चार जण सुरी, सत्तूर, फायटर, लोखंडी रॉड, लाकडी काठीने मारहाण करीत होते.