नाशिक : लोकसभा निवडणूक काळात नाशिकमधील मेळाव्यात थेट उमेदवाराचे नाव जाहीर केल्याने महायुतीत उडालेल्या गोंधळाचा अनुभव पाहता, खा. श्रीकांत शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या नावाबाबत मात्र अतिशय सावध पवित्रा घेतला. नाशिकच्या जागेसंदर्भात वरिष्ठच काय तो निर्णय घेतील, असे स्पष्ट करीत खा. शिंदे यांनी जागा वाटपाच्या मुद्द्यापासून दूर राहणे पसंत केले.
जनसंवाद दौऱ्यानिमित्त नाशिकला आलेल्या खा. शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभेला हेमंत गोडसे यांची उमेदवारी खा. शिंदे यांनी जाहीर केली होती. त्याचे तीव्र पडसाद महायुतीत उमटले होते. नंतर गोडसे यांना अत्यंत विलंबाने उमेदवारी जाहीर करण्यात आली, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. हा अनुभव गाठीशी असल्यामुळे खा. शिंदे यांनी विधानसभेबाबत मौन बाळगणेच पसंत केले.
राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली आहेत. लाडकी बहीण योजना लोकांपर्यंत पोहोचत असून, या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता विरोधकांना धडकी भरली आहे. त्यामुळेच चांगल्या योजनेविषयी विरोधक गैरसमज पसरवत असल्याचा आरोप खा. शिंदे यांनी केला. सत्ता असताना अडीच वर्षे घरी बसणारे आता मतदारांना अधिक काळ अंधारात ठेवू शकणार नसल्याची टीका खा. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
बालेकिल्ल्यात मिळाव्यात अधिक जागा
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने (शिंदे गट) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य व नांदगाव या जागांवर हक्क सांगितला आहे. देवळाली, इगतपुरी, निफाड या जागांची देखील मागणी शिवसैनिकांनी खा. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे. ठाण्यापाठोपाठ नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने या ठिकाणाहून अधिकाधिक जागा शिवसेनेला मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली.