नाशिक : राज्यातील महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांचे नाव निश्चित समजले जात आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक असलेले खासदार हेमंत गोडसे हे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेना पदाधिकारी मंगळवारी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतरही नाशिकची जागा ही शिवसेनेला मिळाली नाही तर खासदार गोडसे हे अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध गोडसे यांच्यात चौथ्यांदा लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातुन हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांचे नाव समोर आल्याने गोडसे आणि शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. सलग दहा वर्षे खासदार असणाऱ्या शिवसेनेच्या गोडसे यांच्या उमेदवारी बाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने ते अपक्ष लढण्याची शक्यता आहे. भुजबळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच गोडसे आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटत नसल्याचे सध्या चित्र आहे. नाशिकमधून उमेदवारी मिळावी यासाठी मंगळवारी पुन्हा एकदा शिवसेना खासदार हेमंत गोडसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. मंगळवारी या दोघांची रात्री उशिरा भेट होण्याची शक्यता आहे.