नाशिक : शहरात धुमाकूळ घालणारा मोटरसायकल चोर मुंबई नाका पोलिसांच्या हाती लागला असून, त्याने चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे. संशयिताच्या ताब्यातून एक लाख पाच हजार रुपये किमतीच्या चार मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, त्याच्या अटकेने अजून काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे.
सोहेल उर्फ बाबू पप्पू अन्सारी (रा. भारतनगर) असे अटक करण्यात आलेल्या मोटरसायकल चोरट्याचे नाव आहे. पोलीस शिपाई गणेश बोरणारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. भारतनगर भागात दोन चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने भारतनगर येथील नंदिनी नदीच्या किनारी असलेल्या मस्जिदच्या बाजूची गल्ली नं. १२ येथे सापळा लावला असता, चोरटा एका दुचाकीवर बसून विक्री करताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून दोन मोटरसायकली (एमएच ३७ एएफ ५३०७) व (एमएच १५ एफवाय ९५८६) हस्तगत करण्यात आल्या असून, त्याने अजून दोन मोटारसायकली काढून दिल्या आहेत. संशयिताच्या अटकेने मुंबई नाका पोलिसांचे दोन व इंदिरानगर व गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेले प्रत्येकी एक असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीनिवास देशमुख, उपनिरीक्षक निसार शेख, जमादार रोहिदास सोनार, अंमलदार समीर शेख, गणेश बोरणारे, नवनाथ उगले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.