अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील येवती येथे शेतकरी कुटुंबातील मायलेकाच्या अंगावर वीज पडून दुर्घटना घडली. हे दोघे शेतात कांदे झाकण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान वीज पडली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर येवती गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मीनाबाई बाजीराव आढाव (वय 50) आणि नवनाथ बाजीराव आढाव (वय 26) असे यामध्ये मृत्यू झालेल्या मायलेकाचे नाव आहे. या दोघांच्या अंगावर वीज पडली. गावात पावसाचे वातावरण झाल्यामुळे हे दोघे शेतात कांदे झाकण्यासाठी गेले होते. पाऊस सुरू झाल्याने ते लिंबाच्या झाडाच्या आडोशाला थांबले. त्यावेळी त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, मोठा आवाज आल्यामुळे शेजारील शेतकऱ्याचे तिकडे लक्ष गेले. त्यांनी जाऊन पाहिले असता मीनाबाई बाजीराव आढाव व त्यांचा मुलगा नवनाथ बाजीराव आढाव हे जागीच मृत्यू झाल्याचे आढळले. याप्रकरणी पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.