नंदुरबार : देशभरात निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. आता लोकांच्या नजरा चौथ्या टप्प्याच्या मतदानाकडे लागल्या आहेत. 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात 10 राज्यांमधील लोकसभेच्या 96 जागांवर मतदान होणार आहे. त्यापूर्वीच नंदुरबार येथील जाहीरसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मोदी जिवंत असेपर्यंत कोणत्याही धर्माला एससी-एसटी-ओबीसीचे मी आरक्षण देऊ देणार नाही,’ असे म्हटले. तसेच ‘मी अत्यंत जबाबदारीने सांगत आहे की, मोदी वंचितांच्या हक्काचा चौकीदार आहे’, असे ते म्हणाले.
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील नंदुरबारमध्ये आयोजित सभेला संबोधित केले. यावेळी मोदींनी देशातील आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठे भाष्य केले. सभेदरम्यान, मोदींनी ‘मोदी जिवंत असेपर्यंत कोणत्याही धर्माला एससी-एसटी-ओबीसीचे मी आरक्षण देऊ देणार नाही,’ असे म्हटले होते. तसेच , ‘मी अत्यंत जबाबदारीने सांगत आहे की मोदी वंचितांच्या हक्काचा चौकीदार आहे’, असे म्हणत त्यांनी उपस्थितांना विश्वास दिला.
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आरक्षणाबाबत काँग्रेसची अवस्था अतिशय गोंधळ निर्माण करणारी आहे. धर्माच्या आधारे आरक्षण हे बाबासाहेबांच्या आणि संविधानाच्या विरुद्ध आहे. पण दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचे आरक्षण हिसकावून त्यांच्या व्होटबँकेला द्यायचा हा काँग्रेसचा अजेंडा आहे’, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
विकासात मोदींशी स्पर्धा करू शकत नाही हे काँग्रेसला माहीत आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीत खोट्याचा कारखाना उघडला असून खोटेपणा पसरवून मते मिळवायची आहेत. कधी आरक्षणाबाबत खोटे बोलतात, तर कधी संविधानाबद्दल खोटे बोलतात. एकही गरीब कुपोषणाला बळी पडू नये याची आम्हाला काळजी होती.
आज नंदुरबारमधील १२ लाखांहून अधिक लोकांना मोफत रेशन मिळत आहे. एका बाजूला भाजपचे प्रयत्न आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. काँग्रेसने आदिवासी बांधवांची कधीच पर्वा केली नाही. आदिवासी भागात सिकलसेल ॲनिमिया हा मोठा धोका आहे, पण काँग्रेसने या आजाराकडे फारसे लक्ष दिले नाही.