नाशिक : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशातच आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने एका हॉटेलमध्ये चक्क हॉटेल कर्मचाऱ्याला बंदूक दाखवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भात विशाल झगडे याला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक रोड येथील एका हॉटेलमध्ये विशाल झगडे आणि त्याचे दोन साथीदार हे जेवायला गेले होते. मात्र हॉटेल कर्मचाऱ्यास त्यांनी बोलावून शिवीगाळ केली आणि त्यावरून झालेल्या धक्काबुक्कीत नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या विशाल झगडे या सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने थेट बंदूक काढून धमकावले.
या प्रकरणी विशाल झगडे याचा विरोधात नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल झगडे याला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान ही संपूर्ण घटना हॉटेलमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या व्हिडिओच्या आधारे पोलीस पुढील कारवाई करत आहे.