नाशिक : नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर हॉटेलमध्ये पोलीस अंमलदाराने वेटरवर सर्व्हिस रिव्हॉल्व्हर रोखल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी घेतली असून संशयित पोलीस अंमलदारास निलंबित केले आहे. तसेच याप्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील एका आमदाराचा अंगरक्षक असलेल्या अंमलदार विशाल झगडे याने यापूर्वीही अनेकांना धमकावल्याचेही प्रकार समोर आले आहे. नाशिकरोड येथील हॉटेल रामकृष्ण येथे शुक्रवारी (दि. १०) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये संशयित पोलीस विशाल झगडे दोघा साथीदारांसह जेवणासाठी आला. त्यावेळी ही घटना घडली. झगडे याने हॉटेलमधील वेटर सीराज शेख यास बोलावून तंदूर रोटी मागितली. त्यावेळी त्याने रोटी संपल्याचे सांगताच विशाल झगडे याने वेटरला शिवीगाळ करीत, त्याच्याकडील शासकीय रिव्हॉल्व्हर काढून वेटर शेख याच्यावर रोखली आणि त्यास शिवीगाळ करीत धमकावले.
याप्रकरणी सागर निंबा पाटील (रा. आगार टाकळी रोड, उपनगर) यांच्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित पोलीस झगडे याच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणची शांतता भंग करण्यासह अग्निशस्त्र दाखवून धमकावणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.